घटस्फोटाच्या खटल्यातील महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप; कोल्हापुरात १५ वकिलांवर गुन्हा
कोल्हापूर : न्याय मिळवण्यासाठी कोर्टात गेल्यावर न्यायालयाच्या आवारात जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीला सामोरे जावे लागल्याची तक्रार कोडोलीतील महिलेनं केलीय. या प्रकरणी तब्बल १५ वकिलांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात मुंबई आणि गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे, तसंच कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांचाही समावेश असल्यानं कायदेवर्तुळात मोठी खळबळ उडालीय.
संबंधित महिलेने दखल केलेल्या तक्रारीनुसार, ७ मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीतील तळमजल्यावरील झेरॉक्स सेंटर परिसरात हा प्रकार घडला. फिर्यादी अश्विनी उर्फ पल्लवी निखिल पाटील (वय ३०, रा. वारणा कोडोली, ता. पन्हाळा) या घटस्फोटाच्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोर्टात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पती निखिल यांच्याकडं कपडे व घरगुती साहित्याची मागणी केली. याच वेळी अॅड. काजल शेळके यांनी हस्तक्षेप करत फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप संबंधित महिलेनं केलाय. “तुमची भीक मागायची लायकी आहे” असे म्हणत त्यांनी अश्विनी यांच्या कानशिलात लगावल्यानं त्यांच्या गालातून रक्त आल्याचं फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर हिरकणी कक्षासमोर गोंधळ उडाला. काचांवर हात मारून तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाल्याचे समोर आलंय. गोंधळ ऐकून घटनास्थळी आलेल्या इतर वकिलांनीही फिर्यादीला धमकावल्याचा आरोप आहे. “हिला बाहेर काढा”, “हिला मारायचे आहे”, “हिचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये” अशा शब्दांत जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलंय
गुन्ह्यात अॅड. काजल शेळके, अॅड. मनिषा सातपुते, अॅड. साक्षी निकम, अॅड. हर्षा खंडेलवाल, अॅड. संदीप चौगुले, अॅड. व्ही. आर. पाटील, अॅड. संदीप देशपांडे, अॅड. नारायण भांदिगरे, अॅड. विवेक घाटगे, अॅड. सुरज भोसले, अॅड. स्वाती तनवडे, अॅड. तृप्ती किनरे, अॅड. विद्या कांबळे देशमुख, अॅड. जे. जे. देसाई आणि अॅड. शिल्पा सुतार यांचा समावेश आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव करत असून, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरूय.