गडहिंग्लजमध्ये घरफोडीचा गुन्हा उघड; सराईत चोरट्यास अटक

<p>गडहिंग्लजमध्ये घरफोडीचा गुन्हा उघड; सराईत चोरट्यास अटक</p>

गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने यशस्वी उलगडा करून रेकॉर्डवरील सराईत आरोपीस अटक केली आहे. आनंदा सोमाप्पा सुटकनवार (वय 28, रा. हुक्केरी, जि. बेळगाव, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण 5,32,713 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये 33.620 ग्रॅम सोन्याचे दागिने, 126.920 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच 680 रुपये किंमतीची चलनी नाणी यांचा समावेश आहे. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गडहिंग्लज–संकेश्वर मार्गावरील हिटणी फाटा येथे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने सदर घरफोडी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीस पुढील तपासासाठी गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व उपअधीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने केली.