लॉकडाऊनच्या अफवा पसरवू नका, लॉकडाऊनचा कोणताही…: केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली – आखाती देशांच्या युद्धावर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाचा मथितार्थ लावत अनेकांनी देशात 'लॉकडाऊन' लागणार असल्याचा तर्क लावला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे. यावर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी, “लॉकडाऊनच्या अफवा पसरवू नका, लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही” असे स्पष्टीकरण ट्वीटवरून दिले आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे कि, मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशात पुन्हा 'लॉकडाऊन' लागणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहेत. मात्र, या दाव्यांमध्ये तथ्य नसून पंतप्रधानांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे.
लॉकडाउनबाबत पसरत असलेल्या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत. सरकारच्या पातळीवर असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकार देशात इंधन, ऊर्जा आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील, यासाठी प्रयत्नशील आहे.
प्रत्येक संभाव्य आव्हानाला तोंड देण्यासाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत. भारताने यापूर्वीही जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपली ताकद सिद्ध केली आहे आणि यापुढेही आपण योग्यवेळी, सक्रियपणे आणि समन्वयाने पावले उचलत राहू.