दादर–रत्नागिरी पॅसेंजर रद्द; मनसेकडून तीव्र नाराजी

<p>दादर–रत्नागिरी पॅसेंजर रद्द; मनसेकडून तीव्र नाराजी</p>

मुंबई — दादर–रत्नागिरी पॅसेंजर गाडी (क्र. ५०१०३/५०१०४) रद्द करून तिच्या जागी दादर–गोरखपूर गाडी सुरू केल्याच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केलीय. मनसे नेते तथा माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून ही गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केलीय.

कोविड काळात मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, मुंबई-मनमाड गोदावरी एक्सप्रेस, पुणे-भुसावळ पॅसेंजर, पंढरपूर एक्सप्रेस यासारख्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, मात्र परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही या गाड्या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या नाहीत, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे. त्याऐवजी परराज्यातील गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दादर–रत्नागिरी पॅसेंजर गाडी कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची होती. ही गाडी रद्द केल्यामुळे मुंबईकर आणि कोकणवासीयांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केलंय.

महाराष्ट्रातील प्रवाशांना डावलून परराज्यातील प्रवाशांना प्राधान्य देणे हा अन्यायकारक प्रकार असल्याचे सांगत, या निर्णयामुळे जनतेमध्ये नाराजी पसरली असल्याचेही सरदेसाई यांनी म्हटलंय. दरम्यान, दादर–रत्नागिरी पॅसेंजर गाडी तात्काळ पूर्ववत सुरू करावी, तसंच राज्यातील इतर रद्द करण्यात आलेल्या गाड्याही पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी मनसेकडून करण्यात आलीय.