कोल्हापुरात ‘मिलेट रॅली’द्वारे पौष्टिक तृणधान्यांचा जागर...

<p><strong>कोल्हापुरात ‘मिलेट रॅली’द्वारे पौष्टिक तृणधान्यांचा जागर...</strong></p>

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा आणि नागरिकांमध्ये पौष्टिक आहाराबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने कृषी विभाग, कोल्हापूर यांच्या वतीने २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर २२ मार्च रोजी ‘मिलेट रॅली’ काढण्यात आली असून, कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.

‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षा’निमित्त आयोजित या रॅलीला विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर-नरवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, तसेच नामदेव परीट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महिला बाईक रायडर्सचे आकर्षण..

रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला बाईक रायडर्स होत्या. कृषी विभागातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नऊवारी साडी आणि भारतीय पेहरावात दुचाकींवरून सहभाग नोंदवत तृणधान्यांचा संदेश दिला. दसरा चौक येथून सुरू झालेली ही रॅली बिंदू चौक, उमा टॉकीज चौक, बागल चौक आणि जनता बाजार चौक मार्गे व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे संपन्न झाली.

तृणधान्यांचे महत्त्व अधोरेखित...

या रॅलीद्वारे पौष्टिक तृणधान्ये, गळीतधान्ये आणि रसायनमुक्त शेतीमालाच्या वापराबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी आहारात तृणधान्यांचा समावेश करण्याचे आवाहन करण्यात आले. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राजगिरा यांसारखी तृणधान्ये लोह, कॅल्शियम आणि झिंकने समृद्ध असून ती ग्लुटेनमुक्त आहेत. ही पिके मधुमेह, हृदयविकार आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शेतकरी-ग्राहक थेट जोडणीवर भर...

शेतकरी ते ग्राहक थेट जोडणी मजबूत करण्यासाठी कृषी विभाग विविध उपक्रम राबवत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे हे विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सेंद्रिय शेती, तृणधान्य उत्पादन व वापर वाढविणे, महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आगामी काळातही विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.