अशोक खरात प्रकरण : मंत्र्यांना सहआरोपी करेपर्यंत भोंदुगिरी थांबणार नाही : खा. संजय राऊत
मुंबई - महाराष्ट्र हा खूप पूर्वीपासून पुरोगामी, सुधारणावादी विचारांचा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रात बुवाबाजी आणि भोंदुगिरी फोफावत असेल तर भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी केले पाहिजे. मंत्र्यांना सहआरोपी करेपर्यंत भोंदुगिरी थांबणार नाही. जे कुणी यातून पळवाट काढत आहेत ते खोटं बोलत आहेत, असा आरोप खा. संजय राऊत यांनी केला आहे.
सिन्नर तालुक्यातील श्री शिवनिका संस्थानचा अध्यक्ष अशोक खरात याला महिलेवरील अत्याचार प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तसेच या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत.
नाशिकमधल्या एका वृत्तपत्रात खरातच्या कारनाम्यांबाबत लेखमालाही प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी पत्रकाराला धमक्या देण्यात आल्या. २००३ आणि २००५ या दोन्ही वर्षांत गुन्हे दाखल झाले आहेत तरीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे अशोक खरातकडे जात असतील आणि पूजाविधी करत असतील, जादूटोणा करत असतील तर या सगळ्यांना सहआरोपी केलं पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.