कोल्हापूरमध्ये पाणीपुरवठ्यावरून महापालिका–जलसिंचन विभाग आमनेसामने, जलसिंचन कार्यालय केलं सील*

<p>कोल्हापूरमध्ये पाणीपुरवठ्यावरून महापालिका–जलसिंचन विभाग आमनेसामने, जलसिंचन कार्यालय केलं सील*</p>

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि जलसिंचन विभाग यांच्यातील आर्थिक वाद चिघळल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेकडून तब्बल १६५ कोटी रुपयांची थकबाकी न भरल्यामुळे जलसिंचन विभागाने कठोर भूमिका घेत आज सकाळी शहराचा पाणीपुरवठा बंद केला.

या कारवाईदरम्यान नागदेववाडी, शिंगणापूर, बालिंगा आणि काळम्मावाडी येथील चार उपसा केंद्रांवर जाऊन यंत्रणा बंद करून ती सील करण्यात आली असल्याची माहिती मिळते. वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, महापालिकेनेही प्रत्युत्तरादाखल धैर्यप्रसाद हॉल येथील सिंचन भवन सील करण्याची कारवाई सुरू केली. जलसिंचन विभागाकडून महापालिकेचा घरफाळा सुमारे ७.२४ कोटी रुपये आणि पाणीपट्टी ३.३२ कोटी रुपये थकीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या परस्पर कारवाईमुळे प्रशासनात तणाव निर्माण झाला असून शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.पाणीपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

किमान ३० कोटी रुपये तत्काळ जमा केल्यासच सील हटविण्याबाबत विचार केला जाईल असं जलसिंचन विभागाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून निधी उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या असून पर्यायी पाणीपुरवठ्याचे उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या घडामोडींवर कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.