१६५ कोटींच्या थकबाकीमुळे महापालिकेचा पाणीपुरवठा तोडला; चार उपसा केंद्रे सील?

<p>१६५ कोटींच्या थकबाकीमुळे महापालिकेचा पाणीपुरवठा तोडला; चार उपसा केंद्रे सील?</p>

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेवर असलेल्या तब्बल १६५ कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे पाटबंधारे विभागाने कठोर कारवाई करत शहराचा पाणीपुरवठा तोडला आहे. तसेच नागदेववाडी, शिंगणापूर, बालिंगा आणि काळम्मावाडी येथील उपसा केंद्रे सील करण्यात आल्याची माहिती मिळतीय. या घटनेमुळे महापालिकेवर मोठी नामुष्की ओढवली असून शहरात खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, पाटबंधारे विभागाकडून वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने अखेर ही कठोर कारवाई करण्यात आली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित उपसा केंद्रांवर जाऊन यंत्रणा बंद करून सील केली.

या कारवाईमुळे कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर तात्काळ परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, पाटबंधारे विभागाने महापालिकेला स्पष्ट इशारा दिला असून, किमान ३० कोटी रुपये तत्काळ जमा केल्यासच सील काढण्याचा विचार केला जाईल, असे सांगितले आहे.

या घटनेमुळे महापालिका प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून तातडीने निधी उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नागरिकांना दिलासा देण्यासाठी पर्यायी पाणीपुरवठ्याचे उपाय शोधण्याचे प्रयत्नही सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.