कोल्हापूर महापालिकेच्या सभेत गोंधळ; नगरसचिव उशिरा आल्याने विरोधक आक्रमक, निलंबनाची मागणी, महापौरांवर दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की.!
कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा आज प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली. ठरलेल्या वेळेला सभा सुरू होणार असल्याची नोटीस देऊनही नगरसचिव सुनील बिद्रे वेळेवर उपस्थित न राहिल्याने सभागृहात संतापाचे वातावरण निर्माण झाले. ही केवळ निष्काळजीपणा नसून प्रशासनातील शिस्तभंगाचे उदाहरण असल्याची टीका विरोधीपक्ष नेते राजेश लाटकर यांनी केली. अकरा वाजून 33 मिनिटांनी नगरसचिव सभागृहात दाखल होताच विरोधी पक्षनेते लाटकर यांनी त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले. सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केल्याने महापालिकेतील अंतर्गत समन्वयाचा अभाव उघड झाला. दरम्यान, महापौर रूपाराणी निकम यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. केवळ दिलगिरी व्यक्त करून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात आली.