जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवारी अर्ज दाखल
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज दुपारी २ वाजता निवड प्रक्रिया पार पडणार असून, त्याआधी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
सकाळी साडेअकराच्या सुमारास महायुतीकडून बाबासाहेब पाटील, राजवर्धन निंबाळकर, अर्जुन आबिटकर, अंबरीश घाटगे, सुयेशा घाटगे, मनोज फराकटे, कल्लाप्पा भोगण आणि शिल्पा खोत जिल्हा शाहू सभागृहात दाखल झाले. यावेळी अध्यक्षपदासाठी शिल्पा शशिकांत खोत तर उपाध्यक्षपदासाठी तानाजी पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
त्यानंतर काही वेळेतच महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, अभिजीत तायशेटे, अमर पाटील, रसिका पाटील, सागर धुंदरे, संभाजी पाटणकर आणि लखन बाबर हे सभागृहात दाखल झाले. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी रसिका पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, उपाध्यक्षपदासाठी संभाजी पाटणकर यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय. आज दुपारी होणाऱ्या निवड प्रक्रियेकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.