खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शाहू मिलच्या लढ्याचे नेतृत्व करावे : शाहू प्रेमींची मागणी

<p>खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शाहू मिलच्या लढ्याचे नेतृत्व करावे : शाहू प्रेमींची मागणी</p>

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रोजगाराचा विचार करून १९०६ साली शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विनिंग मिल म्हणजे शाहू मिलची स्थापन केली. शासनाच्या अनास्थेमुळे २००३ मध्ये ही मिल बंद पडली आणि अनेकांचा रोजगार गेला. हि बंद पडलेली शाहू मिल पुन्हा पुनरुज्जीवीत व्हावी, यासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समिती आणि शाहू प्रेमी यांच्यावतीने बैठक आयोजित करण्यात आली होती.

 यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरकरांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने स्थापन केलेली शाहू मिल शासनाने पुन्हा सुरु करावी. शाहू मिलसाठीच्या लढ्याचे नेतृत्व खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी करावे, राजर्षी शाहू स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी. कोल्हापूरचे पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्याशी बैठक घेऊन ठोस निर्णय करावा. शाहू मिलसाठी शासनाने मंजुरी द्यावी, अशा अनेक मागण्या करत शाहू प्रेमींनी आपली मते मांडली.

यावेळी बोलताना समितीचे अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी, शाहू मिल सुरु झाल्यानंतर शाहू मिलच्या माजी कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी, संघर्ष केल्याशिवाय कोल्हापूरला काहीच मिळालेले नाही. शाहू मिलला मान्यता न मिळल्यास आमची संघर्ष करण्याची तयारी असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर. के पोवार यांनी, मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन शाहू मिलचा आराखडा मंजूर करुन घेतल्याशिवाय कोल्हापूरची जनता शांत बसणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

डी. जी. भास्कर यांनी, कोल्हापूरात उद्योजकता वाढवणे यासाठी शासनाने शाहू मिल सुरू करावी, शासनाने यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी करत शाहू मिलला मान्यता मिळाली नाही, तर लाखोंच्या संख्येने कोल्हापूरची जनता रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी नगरसेवक शिवाजी कवाळे यांनी, खासदार शाहू महाराज छत्रपतींनी फक्त आदेश द्यावा. आम्ही लढ्यासाठी तयार आहोत, असे सांगितले. यानंतर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी, शाहू प्रेमींची मत ऐकून घेतल्यानंतर शाहू मिलसाठी शासन दरबारी प्रयत्न करु, अर्थसंकल्पात शाहू मिलच्या निधीसाठी तरतूद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींशी बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू. वस्त्रोद्योग विभागाकडे याचा पाठपुरावा करुन शाहू मिल पुन्हा सुरु करण्यासाठी पाठपुरावा करु, अशी आश्वासने दिली. तसेच जर शासनाने मान्यता दिली नाही तर शाहूप्रेमींची वज्रमूठ बांधून संघर्षासाठी तयार राहू असेही खासदार शाहू महाराज छत्रपतींनी स्पष्ट केले.

या बैठकीला शाहू मिल कामगार संघाचे शेखर कवाळे, अशोक भंडारे, रवी जाधव, सुभाष देसाई, राजू यादव, अनिल कवाळे, संजय देसाई, दिलीप पोवार, रोहित कवाळे, रविंद्र मोरे, संजय मोहिते, अनिल कदम, रूपाली कवाळे, कॉम्रेड दिलीप पवार, बाबा पार्टे, विशाल देवकुळे, संजय शेटे, दिलीप देसाई, रघूनाथ कांबळे, अशोक भंडारी उपस्थित होते.