राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कोल्हापुरातील ड्रग्ज विक्रीचा डाव उधळला; १२.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत

<p>राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कोल्हापुरातील ड्रग्ज विक्रीचा डाव उधळला; १२.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत</p>

कोल्हापूर : कोल्हापूरातील सायबर चौक परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केलीय. कारवाईत एमडी ड्रग्ज म्हणजेच मेफेड्रोन आणि हायड्रोपोनिक गांजा असा एकूण १२ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

१३ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास सायबर चौक ते एनसीसी भवन रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या परिसरात सापळा रचून कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहतीत राहणारा अब्राहम जॉकी घोन्सालीस आणि गडहिंग्लज तालुक्यातील आयनापुर गावातील शाहीद ईब्राहीम मोकाशी या दोन संशयितांना ताब्यात घेतलंय. तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यातून सुमारे ६८.८७ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि ३१.३१० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, तसच मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण १२ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करतायत.

दरम्यान, अब्राहम घोन्सालीस हा इव्हेंट मॅनेजमेंट चे काम करतोय, तर शाहीद मोकाशी हा कोल्हापुरात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेतो. यामध्ये हायड्रोपोनिक गांजा हा एक वेगळ्या प्रकारे तयार केला जात असून हाय प्रोफाईल लोक याचा वापर करतात. तपासात ड्रग विक्री करणारी कोल्हापुरातील मोठी चेन सापडण्याची शक्यता आहे.

पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर, पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर, सचिन पाटील, शाहू तळेकर, सुशांत तळप यांच्या पथकानं ही कारवाई केली.