एसटीच्या नवीन बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केलीय : आ. सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत प्रश्न

<p>एसटीच्या नवीन बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केलीय : आ. सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत प्रश्न</p>

मुंबई - राज्य परिवहन महामंडळाच्या ८ हजार बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया नऊ महिन्यांपासून प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. राज्याच्या ग्रामीण भागात एसटी प्रवासाला प्रवाशांकडून अधिक प्रतिसाद मिळत असून त्यातून महामंडळाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. त्यामुळे एसटीच्या ताफ्यात नवीन ८ हजार बसेसची खरेदी करून नवीन बसस्थानकांची उभारणी तसेच दुरुस्तीसाठी सन २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात २ हजार ४६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यातील १६०० कोटी रुपये खर्चाविना शिल्लक आहेत. बसस्थानकांच्या कामाची निविदा आणि ८ हजार नवीन बसेस खरेदीकरीता तरतूद केली असताना या बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया नऊ महिने होऊन देखील पूर्ण न झाल्यामुळे निधी खर्च होऊ शकला नाही, हे खरंय का? नवीन बस खरेदी आणि बस स्थानकांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केलीय ? असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले.

यावर उत्तर देताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य परिवहन महामंडळामार्फत ८ हजार नवीन तयार बसेस खरेदी करण्यात येत असून त्यापैकी ३००० बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झालीय तर ५००० बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.  वाहन खरेदी भांडवली प्रकारची असून मोठ्या रकमेची असते. ही बाब लक्षात घेता एसटी च्या ८००० नवीन बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया रखडली असे म्हणता येणार नाही, असा दावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. बसस्थानकांच्या पुनर्बाधणी आणि नुतनीकरण कामांच्या निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.