गुटखा, अंमली पदार्थांची बेकायदा विक्री,साठा आणि वाहतूक प्रकरणी काय कारवाई केली ? : आ. सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत प्रश्न
कोल्हापूर - राज्यात मुंबई, ठाणे, पालघर ग्रामीण आणि शहरी भागातील पानपट्टी दुकानांवर गुटखा आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांची सर्रासपणे विक्री होत आहे. भिवंडीत काही दिवसांपूर्वी ३ टेम्पोसह ५५ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. राज्यात गुटखा आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांच्या अवैध साठ्याची वाहतूक होत असून अशा पदार्थांची राज्यात रेल्वे, पानपट्टी, बसस्थानक, कॉलेज अशा सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे विक्री होत आहे. याकडे आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत लक्ष वेधले.
गुटखा आणि तत्सम अंमली पदार्थांची अवैध मार्गाने विक्री, साठा आणि वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांवर तसेच संबंधित क्षेत्रातील जबाबदार अधिकाऱ्यांवर आतापर्यंत काय कारवाई करण्यात आलीय, असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.
यावर उत्तर देताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी, भिवंडीसह नाशिक - मुंबई महामार्गावरील सोनाळे याठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईची कबुली दिली. त्याचबरोबर कोकण विभागात १ एप्रिल, २०२५ ते ३१ जानेवारी, २०२६ या कालावधीत ७१ ठिकाणी कारवाई करून ५६ इसमांविरुद्ध प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असल्याचे सांगितले.
अन्न आणि औषध प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना, त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रतिबंधित अन्नपदार्थांची अवैध मार्गाने विक्री, साठा आणि वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठा आणि वितरण होत असल्याचे निदर्शनाला आले तर, कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.