आत्मनिर्भरतेचा डंका वाजवणारे मोदी सरकार सध्याच्या संकटाचा सामना करण्यास ठरलं अयशस्वी : अॅड. प्रकाश आंबेडकर
मुंबई – आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे देशात पेट्रोल आणि गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी, सध्या युद्धामुळे देशावर इंधनाच्या टंचाईचे संकट उभे राहिले आहे. या संकटावर मात करण्यास केंद्र सरकार सध्या सज्ज नाहीय. यासाठी केंद्राने एस्मा कायदा लागू केला आहे. त्यामुळे देशात सर्वकाही आलबेल आहे असे नाही. सध्या सरकारची सर्व रणनीती उघड्यावर पडली आहे. कित्येक वर्षापासून आत्मनिर्भरतेचा डंका वाजवणारे मोदी सरकार या संकटाचा सामना करण्यास पूर्णपणे अयशस्वी ठरलं असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
सध्या देशात सुरु असलेल्या इंधन तुटवड्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी लहान - मोठ्या अशा हॉटेल, धाबा आणि हॉस्पिटल सेक्टर यांची रोजी रोटी काढून घेतली आहे. केंद्र सरकारच्या या नियोजन शून्यतेमुळे सर्वसामान्य लोकांच्या पोटावर पाय आला आहे. तसेच याचा परिणाम धार्मिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमावर होऊ लागला आहे. मोदी सरकार अमेरिकेसमोर उघडा पडला आहे आणि देशाच्या सर्वसामान्य लोकांनाही उघडे पाडल्याचा दावा त्यांनी केला आहे.