अतिक्रमण कारवाई टाळण्यासाठी लाच घेताना महापालिकेचा अतिक्रमण विभागातील अधीक्षक रंगेहाथ अँटी करप्शनच्या जाळ्यात

<p>अतिक्रमण कारवाई टाळण्यासाठी लाच घेताना महापालिकेचा अतिक्रमण विभागातील अधीक्षक रंगेहाथ अँटी करप्शनच्या जाळ्यात</p>

कोल्हापूर : रंगपंचमीच्या निमित्ताने लावलेल्या रंग विक्रीच्या स्टॉलवर कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. 10 मार्च) करण्यात आली. विलास शामराव साळोखे (वय 55, अधीक्षक, इस्टेट विभाग, अतिरिक्त कार्यभार – अतिक्रमण विभाग, कोल्हापूर महानगरपालिका, रा. संत सेना महाराज नगर, फुलेवाडी, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांनी रंगपंचमीच्या सणानिमित्त रंग विक्रीसाठी स्टॉल लावला होता. हा स्टॉल अतिक्रमण असल्याचे सांगून त्यावर कारवाई करण्याची भीती दाखवत साळोखे यांनी कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीला 1500 रुपयांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे 10 मार्च रोजी प्राप्त झाली. त्यानुसार तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता साळोखे यांनी तक्रारदाराकडे 2000 रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान साळोखे यांनी तक्रारदाराकडून 2000 रुपयांची लाच स्वीकारताच पंचासमक्ष त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

तपासादरम्यान लाचेची रक्कम आरोपीने आपल्या मोटरसायकलवरील पिशवीत ठेवलेली आढळून आली. त्यामुळे मोटरसायकल व पिशवी सापळा पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आली आहे. तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले असून प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रकाश भंडारे, हवालदार विकास माने, सुधीर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार व प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली.