येत्या मे पासून मिसिंग लिंक मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन : आ. सतेज पाटील यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई - मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.
मुंबई ते पुणे द्रुतगती या महामार्गावर खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिका मिसिंग लिंकचे काम सन २०१९ मध्ये राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले होते. हा प्रकल्प मूळ उद्दिष्टानुसार सन २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही हा प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे.
मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या एक्स्प्रेसवेवर गेल्या काही दिवसात प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते आहे. काही दिवसांपूर्वी सुमारे ३६ तास चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. या घाटातील अरुंद आणि अपघाती वळणांमुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाचा असलेला मिसिंग लिंक प्रकल्प पूर्णत्वासाठी लागणारा वेळ सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. आमदार सतेज पाटील यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले.
मुंबई ते पुणे प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या खर्चात दहा टक्क्यांनी वाढ होवून या प्रकल्पाचे काम प्रलंबित राहिले आहे. याची काय कारणे आहेत ? यामध्ये वाढीव खर्चाची तरतूद करण्यात आली आहे काय ? या कामाला विलंब झाल्याने सुधारित खर्चात रुपये ६ हजार ८५० कोटी वरून ७५०० कोटी रुपये एवढी वाढ झाली आहे. याबाबत शासनाने माहिती घेऊन या कामाला विलंब करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कोणती कारवाई केली? आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तात्काळ तयार करण्याच्या सूचना देऊन सोबतच मिसिंग लिंकचे कामही लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली ? असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले.
यावर खुलासा करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प अद्याप अपूर्णावस्थेत असल्याची कबुली दिली. या प्रकल्पाच्या कामात विविध तांत्रिक आणि भौगोलिक अडचणीमुळे कामाच्या मुदतीत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
तथापि, सद्यःस्थितीत ९७.७ टक्के काम पूर्ण झाले असून येत्या मे, २०२६ पासून मिसिंग लिंक मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.