“मंत्रीपदाची ऑफर आणि मधुरीमाराजेंचे हसरे उत्तर”; कार्यक्रमात रंगली राजकीय मिश्कील चर्चा

<p>“मंत्रीपदाची ऑफर आणि मधुरीमाराजेंचे हसरे उत्तर”; कार्यक्रमात रंगली राजकीय मिश्कील चर्चा</p>

कोल्हापूर - येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या मतदारसंघांची चर्चा आणि महिलांसाठी वाढणाऱ्या आरक्षणाच्या शक्यतांमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशाच एका सामाजिक कार्यक्रमात आज राजकीय रंगतदार आणि थोड्याशा उपरोधिक चर्चेची रंगत पाहायला मिळाली.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी मधुरीमाराजे छत्रपती यांच्याशी हलक्याफुलक्या शैलीत राजकारणाचा विषय काढला. महिलांसाठी राखीव होणाऱ्या संभाव्य मतदारसंघाच्या चर्चेतून जाधव यांनी थेट ऑफरच दिली—“तुम्ही भाजपमध्ये या, आम्ही तुम्हाला राज्याचे कॅबिनेट मंत्री करतो!

या ऑफरवर मधुरीमाराजे यांनीही तितक्याच मिश्कील शैलीत उत्तर देत वातावरण हलकं फुलकं केलं. “मला काही नको बाबा… मी आहे तिथेच बरी आहे,” असे म्हणत त्यांनी हसतच विषयाला पूर्णविराम दिला

याच वेळी उपस्थित असलेल्या दिलीप देसाई यांनीही या चर्चेत उडी घेत “आम्ही सामाजिक कार्य सोडून तुमचे कार्यकर्ते होणार,” अशी घोषणा करत वातावरणात आणखी रंग भरला. त्यावेळी बाजूलाच उभे असलेले पत्रकारही या गंमतीशीर चर्चेत सामील झाले आणि “हो… हो…” म्हणत त्यांनीही या राजकीय ‘ऑफर’ला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचीच चर्चा रंगली.

क्षणभर कार्यक्रमाचे वातावरण अगदी राजकीय व्यासपीठासारखे झाले होते. मात्र हे सगळे संभाषण मिश्कील आणि उपरोधिक शैलीतच सुरू असल्याने उपस्थितांमध्ये हास्याची लाट पसरली. आजूबाजूचे सर्वजण या हलक्याफुलक्या राजकीय गप्पांमध्ये रंगून गेले आणि क्षणभरासाठी का होईना, पण ‘कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर’ हीच मुख्य चर्चा ठरली.