कोल्हापूर जिल्ह्यातील औषध निरीक्षक पदांसह अन्य रिक्त पदे कधी भरणार : आ. सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत सवाल

<p>कोल्हापूर जिल्ह्यातील औषध निरीक्षक पदांसह अन्य रिक्त पदे कधी भरणार : आ. सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत सवाल</p>

मुंबई - जिल्ह्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागात औषध निरीक्षकासह इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने  कोणती कार्यवाही केली आहे, असा प्रश्न विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. यावर उत्तर देताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी, औषध निरीक्षक गट ब संवर्गाच्या एकूण १५४ पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येत असल्याचे सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागात औषध निरीक्षकासह इतर कर्मचा-यांची पदे  रिक्त  असल्याची बाब डिसेंबर, २०२५ मध्ये निदर्शनास आली. या रिक्त पदांमुळे बनावट, कालबाह्य औषधे, साठेबाजी आणि  नियमबाह्य व्यवहार वाढले आहेत. जिल्ह्यात औषध तपासणीची यंत्रणा अपुरी असून प्रभावीपणे कार्यवाही करण्यास मर्यादा येत आहेत, याकडे आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधले.

या विभागाच्या नियंत्रणाखाली डॉक्टर,  घाऊक औषध वितरक, किरकोळ औषधे, रक्तपेढ्‌या, अॅलोपॅथीक आयुर्वेदिक औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्या आदी घटक येत असून त्यांची तपासणी करण्याची जबाबदारी औषध निरिक्षकावर असते पण  अपुऱ्या पदांमुळे  कर्मचाऱ्यांच्या  कामावर ताण पडत असून मर्यादा येत आहेत. त्यामुळे  कोल्हापूर जिल्ह्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागात औषध निरीक्षकासह इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे  भरण्याबाबत  शासनाने  कोणती कार्यवाही केली, असा प्रश्न आमदार सतेज पाटील विधानपरिषदेत उपस्थित केला.

 यावर उत्तर देताना अन्न आणि  औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी, कोल्हापूर जिल्ह्यात अन्न आणि  औषध प्रशासन विभागातील  औषध निरीक्षकाची सहा पदे आणि  सहायक आयुक्त हे एक पद रिक्त आहे. पण या पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवला असल्याचे सांगितले.

तसेच औषध निरीक्षक गट ब संवर्गाच्या एकूण १०९ पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९ जुलै २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या जाहिरातीत अतिरिक्त ४५ पदांचा नव्याने समावेश करून एकूण १५४ पदांची भरती करण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठवले असल्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.