बँकिंग क्षेत्रात वाढत असलेले सायबर गुन्हे रोखण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली : आ. सतेज पाटील यांचा सवाल
कोल्हापूर - बँकिंग क्षेत्रात वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांबाबतचा प्रश्न काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. राज्यात बँकिग क्षेत्रातील आर्थिक गैरव्यवहारांमुळे सामान्य खातेधारक चिंताग्रस्त झाले असून यामुळे अनेक खातेधारकांचे पैसे बँकामध्ये अडकले आहेत.
सध्या आर्थिक गैरव्यवहारांच्या तुलनेत सायबर आर्थिक गुन्ह्यांमध्ये तीनपट वाढ झाल्यामुळे बँक खातेधारक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात वाढत असलेले सायबर गुन्हे रोखण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केलीय. तसेच बँकांतील आर्थिक गैरव्यवहारांमुळे खातेधारकांचे अडकलेले पैसे त्यांना परत मिळण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केलाय का ? असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केले.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राज्य शासनाने सायबर फसवणुकीला बळी पडणाऱ्या नागरिकांना विशेषतः महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि संसाधनांनी युक्त अशा उपाय योजनांचा समावेश असलेला महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र सायबर कार्यालयाकडून २६ तज्ञ सल्लागारांच्या मदतीने राज्यातील १००० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फॉरेन्सिक टूल्सचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.