शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ होणार : मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर  

<p>शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ होणार : मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर  </p>

मुंबई – आज मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी त्यांनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचे जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे.
या योजनेत केवळ कर्जमाफीच नव्हे, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  
जिल्हा वार्षिक निधीसाठी 21 हजार 867 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  यावर्षी अर्थसंकल्पासाठी ७ लाख ६९ हजार ४६७ कोटी रुपयांची खर्चासाठी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये ४० हजार ५५२ कोटी रुपयांची तूट येत आहे. राजकोषीय तूट ही ३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात शासन यशस्वी ठरले आहे तर महसुली तूट ही १ टक्क्यांपेक्षा कमी राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.