शाहू मिल पुनर्जीवित करण्यासाठी खा. शाहू महाराज छत्रपतींनी लढ्याचे नेतृत्व करण्याची मागणी

<p>शाहू मिल पुनर्जीवित करण्यासाठी खा. शाहू महाराज छत्रपतींनी लढ्याचे नेतृत्व करण्याची मागणी</p>

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी लोकांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने १९०६ साली शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विनिंग मिलची स्थापना केली होती. या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. पण शासनाच्या अनास्थतेमुळे २००३ मध्ये ही मिल बंद पडली आहे. सध्या या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभा करण्याचा विचार सुरू आहे. मात्र ज्या उद्देशाने ही मिल स्थापन केली होती. तो मूळ उद्देश जोपासला जावा, त्याठिकाणी शाहू मिलची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

या सर्व संघटनांनी आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेत त्यांनी या लढ्याचे नेतृत्व करावे, असे आवाहन केले. यावेळी बोलताना बाबा इंदुलकर यांनी, शाहू मिलच्या २७ एकर जागेत जर सरकारने ८५ कोटी रुपयांचा निधी उभारला तर एक चांगली आणि अत्याधुनिक दर्जाची सूतगिरणी सुरू होऊ शकते, असा मुद्दा उपस्थित केला. त्या माध्यमातून जवळपास सातशे लोकांना रोजगार मिळू शकतो आणि शाहूंच्या विचारांचे एक चालते - बोलते स्मारक येथे  उभे राहू शकते, असे त्यांनी सांगितले.

विजय देवणे यांनी, खासदार शाहू महाराज यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून टेक्सटाईल फंड आणावा आणि शाहू मिल पुन्हा सुरु करण्यासाठी पत्रव्यवहार करावा, अशी मागणी त्यांनी केली. सुभाष देसाई यांनी, शाहू कालीन अशा अनेक जमिनींवर अनेकांचा डोळा असल्याचे सांगत याला वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

 बाबा पार्टे यांनी, टोल सारखे आंदोलन उभारू पण शाहू मिल पुन्हा सुरु करू, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले. अशोक भंडारी यांनी, शाहू मिल मध्ये जनतेच्या भावना आहेत, पालकमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी आणि त्याचे नेतृत्व तुम्ही करावे, असे आवाहन केले. या संदर्भातील निवेदन खासदार शाहू महाराज छत्रपती यांना देण्यात आले. त्यांनी यावर जिल्हाधिकारी यांच्याशी लवकरच बैठक घेऊ आणि पुढची दिशा ठरवू असे आश्वासन दिले.

यावेळी कॉम्रेड दिलीप पवार, काकासाहेब पाटील, रुपाली कवाळे, सनी कवाळे, संभाजी जगदाळे, सुनील देसाई आदी उपस्थित होते.