अजित पवार यांच्या पक्षाचा ‘हा’ व्हिडीओ व्हायरल...

 नेत्यांची कुजबुज आली चव्हाट्यावर  

<p>अजित पवार यांच्या पक्षाचा ‘हा’ व्हिडीओ व्हायरल...</p>

मुंबई – काल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी  निवड झाली. या निवडीनंतर पक्षाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पक्षाच्या राष्ट्रवादी नेत्यांची कुजबुज कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना न बोलताच जायला सांगितले.  पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मंचाजवळ सतीश चव्हाण, सरोज अहिरे आणि आनंद परांजपे उपस्थित होते. यावेळी सतीश चव्हाण यांनी मला माहिती होतं आधीच म्हणाले. त्यावर सरोज अहिरे यांनी दादांजवळ कधी जाऊ देण्याची संधी नाही दिली माणसांनी, वहिनींजवळ तरी जाऊ द्या...त्यापुढे आनंद परांजपे सांगतात की, तुम्ही प्रश्न नका घेऊ, तुमचं बोलून झालं की निघा, त्यानंतर सतीश चव्हाण यांनी हा...हे चांगले केलं...स्पेशली प्रश्न करू नका म्हणा असं म्हटलं. त्या मनस्थितीत नाही, बोलायचे आपले आणि उठायचे..असं आनंद परांजपे यांनी सांगितले. तर हे उलटे पालटे प्रश्न विचारतील ना..असं सरोज अहिरे यांनी विचारले. त्यावर सतीश चव्हाण यांनी प्रेशराईज करतील तेव्हा तुम्ही उठवा, आम्ही इथं बाजूला थांबू असं त्यांनी आनंद परांजपे यांना सांगितले. त्यानंतर या नेत्यांना बोलू नका, माईक सुरू आहे असं सांगितल्यानंतर ते गप्प बसले.

विशेष म्हणजे पत्रकार परिषदेच्या आधी जी चर्चा सुरू होती तेच पत्रकार परिषदेत घडले. प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे हे माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आले. तेव्हा सतीश चव्हाण यांनी सुनेत्रा पवारांना तुमचे स्टेटमेंट तुम्ही करा असं म्हटले. त्यावर त्यांच्या पलीकडे आम्ही बोलू असं प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांना सांगितले. या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र पत्रकारांनी सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला असता तटकरे-पटेल आणि सुनेत्रा पवार तिघेही जागेवरून उठले. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी तुम्ही निघा असं सुनेत्रा पवारांना सांगितल्याचे ऐकायला आले. त्यानंतर सुनेत्रा पवार निघून गेल्या आणि पटेल-तटकरे यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला.

 

पत्रकार परिषदेच्या मंचावर पक्षाच्या नेत्यांचा कुजबुज केलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने पक्षाची कुजबुज चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे  उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.