अजित पवार अपघात प्रकरण : गुन्हेगारी कट आहे का या अंगाने तपास होतोय : सीआडीचा खुलासा
मुंबई – आ. रोहित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा मुद्दा लावून धरला आहे. या अपघाताबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून न घेतल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. यावर सीआयडीने पत्रकार परिषद घेवून खुलासा केला आहे.
सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी म्हटले आहे कि, "बारामतीतील 28 जानेवारीच्या विमान अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन अजित पवार आणि इतरांच्या मृत्यूचा तपास 194 अंतर्गत सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. या आकस्मिक मृत्यूमागे घातपात आहे का?, गुन्हेगारी निष्काळजीपणा आहे का?, हा गुन्हेगारी कट आहे का ? या अंगाने तपास होत आहे. अनेक संस्था या तपासात सहभागी झाल्या आहेत. या संस्थांचा अहवाल सीआयडीच्या तपासात समाविष्ट करण्यात येणार आहे. आमच्या तपासात काही पुरावे मिळाले आहेत. AAIB चा अहवाल आला की तो आमच्या तपासात समाविष्ट केला जाईल. AAIB चा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निष्कर्ष काढला जाईल. कट किंवा गुन्हेगारी कृत्य असल्याचे निष्पन्न झाल्यास सीआयडी योग्य कलमाखाली गुन्हा दाखल करेल तसेच उर्वरित तपास पूर्ण करुन न्यायालयात अभियोग चालवण्याची तजवीज केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.