अल्लाना समूहाकडून भाजपला 30 कोटींची देणगी; 2019 मधील आयकर छाप्यांच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण

<p>अल्लाना समूहाकडून भाजपला 30 कोटींची देणगी; 2019 मधील आयकर छाप्यांच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण</p>

मुंबई - मांस व कृषी-निर्यात क्षेत्रातील प्रमुख उद्योगसमूह असलेल्या अल्लाना समूहाशी संबंधित चार कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2024–25 मध्ये इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला एकूण 30 कोटींची देणगी दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या कंपन्यांमध्ये Allanasons Pvt Ltd, Frigerio Conserva Allana Pvt Ltd, Frigorifico Allana Pvt Ltd आणि Indagro Foods Pvt Ltd यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्या अल्लाना समूहाचा भाग मानल्या जातात.

2019 मधील छापे आणि बॉण्ड खरेदी-

यापूर्वी 2019 मध्ये अल्लाना समूहाच्या काही कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. त्याच कालावधीत समूहाने सुमारे 7 कोटींचे इलेक्टोरल बॉण्ड्स खरेदी केल्याची नोंद आहे. त्यापैकी 5 कोटींची देणगी शिवसेनेला, तर 2 कोटी भारतीय जनता पार्टीला देण्यात आल्याचे समोर आले आहे. अल्लाना समूहाकडून गेल्या अनेक वर्षांपासून भाजपला निधी दिला जात असल्याचे विविध आर्थिक अहवालांमधून स्पष्ट होते.

बीफ निर्यातीत आघाडी -

दरम्यान, भारताची बीफ (म्हैस मांस) निर्यात 2025 पर्यंत सुमारे 4 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या क्षेत्रात अल्लाना समूह हा देशातील प्रमुख निर्यातदारांपैकी एक मानला जातो. इलेक्टोरल बॉण्ड योजना रद्द करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर विविध राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची माहिती सार्वजनिक होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगसमूह आणि राजकीय पक्षांमधील आर्थिक व्यवहारांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.