कधी तरी नियतीनं त्याचं स्वप्न पूर्ण केलं असतं...: मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अजित पवारांच्या निधनाचा मांडला शोकप्रस्ताव

<p>कधी तरी नियतीनं त्याचं स्वप्न पूर्ण केलं असतं...: मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अजित पवारांच्या निधनाचा मांडला शोकप्रस्ताव</p>

मुंबई – आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय  अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या अनेक आठवणी जाग्या केल्या.

'बोलणं कुठून सुरू करावं हेच कळत नाही. मनात प्रचंड वादळ आहे, अशा प्रकारचा शोक प्रस्ताव मांडावा लागेल अशी कल्पनाच केली नव्हती. सभागृहात नजर गेली की दादा खुर्चीत बसलेले दिसायचे. आज मात्र ते आपल्यात नाहीत याची खंत आहे', असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अजित पवारांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. 

यावेळी विधानसभेत बोलताना त्यांनी, अजित पवार हे वेळ पाळणारे होते. ते कधीच वेळ चुकवत नव्हते पण  त्यांची वेळ चुकली आणि अनर्थ झाला. नाही तर ते आपल्यात असते. असं म्हणत त्यांनी, कधी तरी नियतीनं अजित पवार यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण केलं असतं.  त्यामुळे राज्याला एक चांगला मुख्यमंत्री लाभला असता, असे म्हणाले.