बंगालच्या राजकारणाचे चाणक्य हरपले...
माजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे निधन...
कोलकाता – माजी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य मुकुल रॉय यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. आज पहाटे दीड वाजता कोलकातामधील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांचे वय 69 वर्ष होते.
ते गेल्या काही वर्षांपासून स्मृतिभ्रंश आणि इतर अनेक आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होते. मुकुल रॉय यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे त्यांना 'बंगालच्या राजकारणाचे चाणक्य' म्हणून ओळखले जाते. 1998 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि ते ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते.
यूपीए-2 सरकारच्या काळात त्यांनी जहाजबांधणी राज्यमंत्री आणि 2012 मध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून काम पाहिले. 2011 मध्ये पश्चिम बंगालमधील 34 वर्षांची डाव्यांची सत्ता संपवून तृणमूल काँग्रेसला सत्तेत आणण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.