कोल्हापूर कृषी बाजार समितीत रत्नागिरी हापूस आंब्याचा पहिला सौदा
कोल्हापूर: कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रत्नागिरी हापूस आंब्याचा हंगामातील पहिला सौदा पार पडला. सौद्यामध्ये १५ आंब्यांच्या पेटीला सहा हजार एकवीस रुपये इतका भाव मिळाला. रत्नागिरीतील बेर्डे येथील शेतकरी आकाश तोडकर यांनी आंब्याची पहिली पेटी बाजार समितीत आणली, तर व्यापारी प्रसाद वळंजु यांनी ती खरेदी केली. यंदा हवामान बदलामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला असून फुलोरा जास्त येऊनही अपेक्षित फळधारणा न झाल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा फटका बसला होता. मात्र हंगामातील पहिला आंबा कोल्हापुरात येताच दरात वाढ दिसून आली. सौद्यात चांगला भाव लागल्याने बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. यंदा आंब्याची आवक कमी असल्याने मे महिन्यापर्यंत दर उंच राहतील, तर खवय्यांना कोल्हापुरात ताज्या रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखता येईल, असा अंदाज आहे.