खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला पुण्यात विरोध
पुणे – आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याला विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. यासाठी ‘सकल विद्यार्थी समूहा’च्या वतीने कुलगुरूंना सह्यांचे पत्र देण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा सर्व समाजाच्या सामूहिक चेतनेचा उत्सव आहे, केवळ काही लोकांच्या आग्रहामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला निमंत्रित करणे योग्य नसल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला आहे. कार्यक्रमाबाबत शिवजन्मोत्सव विद्यार्थी उत्सव समितीला पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने अशा प्रकारच्या कार्यक्रमास समर्थन देता येते का, याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, तसेच हा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी, पुणे विद्यापीठाकडून मला अधिकृत कोणतीही माहिती नाही. त्यामुळे आज चार वाजता होणाऱ्या व्याख्यानाला मी जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती देणे हे माझं कर्तव्य आहे. राजकीय जोडे बाजूला ठेऊन मी अशा व्याख्यानाला जात असतो, असे म्हटले आहे.