रोहित पवारांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी : खा. सुप्रिया सुळेंचं ट्वीट 

<p>रोहित पवारांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी : खा. सुप्रिया सुळेंचं ट्वीट </p>

मुंबई – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यामध्ये आ. रोहित पवार यांनी  पुढाकार घेवून अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यासाठी ते वारंवार पत्रकार परिषदही घेत आहेत. यावर खा. सुप्रिया सुळे यांनी  ट्वीट करून, आ. रोहित पवारांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, अशी मागणी केली आहे.


खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे कि, “आदरणीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार  हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका उपस्थित करीत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत. ही उत्तरे मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ती वाढू नये यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा प्रत्येक भारतीयाचा घटनादत्त अधिकार आहे. रोहित व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणे अतिशय गरजेचे असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे”