धनंजय मुंडेंचं आर्थिक फसवणुकीत नाव आलं समोर...अडचणी वाढणार
मुंबई - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याचा आरोप झाला. या आरोपानंतर धनंजय मुंडेंना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच यापूर्वी करुणा मुंडेंचंही प्रकरण खूप चर्चेत आले होते. यानंतर धनंजय मुंडेंचा आणखी एक आर्थिक फसवणुकीचा प्रताप समोर आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
नागपूरमधील रंजना नागपूरकर या महिलेने धनंजय मुंडे, कैलास फड आणि निखील फड यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. तिच्या पतीला सरकारी नोकरीत पुन्हा रुजू करून घेण्यासाठी मुंडे यांनी पैसे मागितल्याचे त्या सांगतात . 'मी एकूण 17 लाख रुपये दिले. प्रथम परळीतील मुंडे यांच्या घरी गेल्या तेव्हा मुंडे यांनी सांगितलं, “जा, तुमचं काम आता पूर्ण झालं आहे.” पण नंतर ना पतीची नोकरी मिळाली, ना पैसे परत मिळाले', असे त्या म्हणाल्या आहेत.
' मी पुन्हा पैसे मागायला परळीतील घरात गेले. तेव्हा तिथे धनंजय मुंडे, कैलास फड, निखील फड यांच्यासोबत मुंडे यांच्या पत्नी आणि आईही उपस्थित होत्या. त्यावेळी मुंडे यांच्यासमोरच माझ्या मानेवर पिस्तूल लावून भीती घातल्याचा आरोप त्यांनी केला. “तू पुन्हा आलीस तर तुला गाडून टाकू, कुणालाही कळणारही नाही”, अशी धमकी मला देण्यात आली. या धमकीनंतर रंजना यांनी त्यांच्या बंगल्यावर जाणं बंद केल्याचे रंजना म्हणाल्या आहेत.
या सर्व प्रकरणाची माहिती रंजना नागपूरकर यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना सांगितल्यानंतर समोर आले आहे. मुंडे यांच्या मानसिक छळामुळे रंजनाताईंच्या पतीचा मृत्यू झाल्याचे जरांगे यांनी सांगितले. त्यांनी मुंडे यांच्यावर आणखी 22 हून अधिक तक्रारी असल्याचंही उघड केले आहे.