अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत मोठी माहिती...एल-३ संभाषणाशी संबंधित माहिती प्राप्त
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यु झाला. या विमान अपघात प्रकरणाचा एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून तपास सुरू आहे. मात्र चौकशीबाबत कोणतीच प्राथमिक माहिती समोर येत नसल्याने आमदार रोहित पवारांसह अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यानंतर अपघाताचा तपास करणाऱ्या एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने महत्वाची माहिती दिली आहे.
विमानातून दोन रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचे काम सध्या सुरू आहे. अपघातानंतर लागलेल्या आगीमुळे विमानाच्या दोन्ही रेकॉर्डर्सना नुकसान पोहोचले होते. असे असूनही, त्यापैकी एल ३ रेकॉर्डरमधून काही डेटा मिळवण्यात यश आल्याचे ब्युरोने सांगितले आहे.
ज्या देशाने हे विमान बनवले होते, त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींकडून तांत्रिक मदतीची मागणी करण्यात आली आहे. तपास प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आणि पूर्णपणे पुरावेनिष्ठ पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे सध्या तर्कवितर्क करण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन ब्युरोने केले आहे.