दोन दिवसांपासून मंत्री नरहरी झिरवळ अज्ञातवासात... अडचणी वाढणार
मुंबई - मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाच घेताना राजेंद्र ढेरिंगे या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. सध्या या राजेंद्र ढेरिंगेच्या घरातून एसीबीला काही कागदपत्रे हाती लागली आहेत. ही कागदपत्रे आज न्यायालयासमोर सादर करण्यात येणार असल्याने मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणीत वाढ होणार आहेत.
या प्रकरणावर बोलताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी, या प्रकरणाच्या चौकशीचे धागेदोरे जर माझ्यापर्यंत आले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे म्हटले होते. ते सध्या दोन दिवसांपासून अज्ञातवासात आहेत. नरहरी झिरवळ यांचा फोन सध्या स्वीच ऑफ आहे. ते आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नरहरी झिरवळांच्या प्रकरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच नरहरी झिरवळ लवकरच आपली बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.