इचलकरंजी महापालिकेचे महापौर अॅक्शन मोडवर...
ढिसाळ कारभारावरून अधिकारी धारेवर
इचलकरंजी - महानगरपालिकेचे महापौरपद स्वीकारताच उदय धातुंडे यांनी पहिल्याच दिवशी महापालिकेतील विविध विभागांच्या खातेप्रमुखांची आढावा बैठक घेत प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली.
शहरातील प्रलंबित कामे, नागरिकांच्या तक्रारी आणि विकास आराखड्याची अंमलबजावणी यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली. बैठकीदरम्यान महापौर धातुंडे यांनी, काही विभागांच्या ढिसाळ कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती आणि मालमत्ता कर वसुली या विभागाच्या कारभारावरून त्यांनी नापसंती व्यक्त केली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.
त्याचबरोबर प्रलंबित प्रकल्पांची अद्ययावत माहिती सादर करण्याचे तसेच ठराविक मुदतीत काम पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्रत्येक विभागाने प्रगती अहवाल सादर करावा, नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान त्यांनी, पाणीपुरवठ्याबाबत तातडीची बैठक शहरातील नियमित आणि मुबलक पाणी मिळावे, यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विशेषतः कृष्णा पाणी पाईपलाईन वारंवार गळती होऊन शहराचा पाणीपुरवठा खंडित होत असल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.