पन्हाळा पंचायत समितीवर शिवसेना - राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होणार : आ.चंद्रदीप नरके
कोल्हापूर - नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पन्हाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला भरघोस यश मिळाले आहे. जिल्हा परिषदेच्या सहा मतदार संघापैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसने तर शिवसेना शिंदे गट आणि जनसुराज्य शक्ती पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. एक जागेवर जनसुराज्य शक्ती पक्षाने पुरस्कृत केलेला अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. पंचायत समितीच्या १२ जागांपैकी ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागा शिवसेनेने आणि ४ जागा जनसुराज्य शक्ती पक्षाने जिंकल्या आहेत.
एका जागेवर जनसुराज्यशक्ती पक्षाने पुरस्कृत केलेला उमेदवार विजयी झाला आहे. पन्हाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची युती ही निवडणुकीपुर्वी देखील होती आणि आज देखील ती कायम असल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी म्हटले आहे.
त्यामुळे पन्हाळा पंचायत समितीवर या दोन्ही पक्षाचे मिळुन सात सदस्य झाल्याने पंचायत समितीवर या दोन्ही पक्षाची सत्ता स्थापन होणार असल्याचा दावा आमदार चंद्रदीप नरके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी पत्रकार बैठकीत केला आहे. या दोन्ही पक्षांनी पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्रितपणे लढवल्या आहेत. जनतेने आम्हाला कौल दिला असुन या सात सदस्यांच्या बळावर आम्ही सभापती आणि उपसभापती पदासाठी सामोरे जात आहे, या चांगल्या कामासाठी सगळ्यांनी मदत करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी देखील यापुर्वी आम्ही नरके - पाटील गट म्हणुन लढतच होतो असा दावा केला आहे. त्याशिवाय तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आणि शिवसेना पक्षाने एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले नव्हते. आता पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी चर्चा करुन ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार निवड निश्चित करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
या पत्रकार बैठकीला गोकुळचे संचालक अजित नरके, नुतन जिल्हा परिषद सदस्य डॉ. जयंत पाटील, भगवानराव पाटील, पुजा पाटील, वर्षाराणी पाटील, नुतन पंचायत समिती सदस्या अलका काळे, रविंद्र पाटील, आण्णासाहेब गायकवाड, माणिक पाटील, भारती पाटील, दत्तात्रय खोत, उज्वला सासणे यांच्यासह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.