अपघाताचं पूर्ण सत्य समोर आलं पाहिजे, ते सत्य निश्चितपणे बाहेर येईल : मुख्यमंत्री
मुंबई – काल आ. रोहित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे कि, "मुळातच मला एक गोष्ट अशी वाटते की, यासंदर्भात जी काही चौकशी सुरू आहे ती, पूर्ण न होता, आपण जर वेगवेगळे तर्क-वितर्क लावले, तर त्यासंदर्भात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. ब्लॅक बॉक्सही सापडलेला आहे, भारतातील चौकशी यंत्रणांवर कोणीही अविश्वास दाखवू नये, भारतातल्या चौकशी यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत, अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडून चौकशीसाठी लोक बोलावले जातात. मला असं वाटतं की, भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण आपल्या देशातल्या एजन्सीवर आपण अशाप्रकारे कधी अविश्वास दाखवत नाही. या ठिकाणीही दाखवण्याचं कारण नाही. आपल्या सर्वांचेच ते लाडके नेते होते, आपल्या सर्वांनाच असं वाटतंय की, त्यांच्या अपघाताचं पूर्ण सत्य समोर आलं पाहिजे, ते सत्य निश्चितपणे बाहेर येईल, हा मला विश्वास आहे... "