अजित पवारांच्या निधनाबाबत आ. रोहित पवारांकडून गंभीर प्रश्न उपस्थित...
मुंबई - दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात झालेल्या निधनावर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी अजित पवारांचा घातपात झाल्याची शंका उपस्थित केली आहे.
दादांच्या विमानाचा अपघात घडवून आणला असेल, याबाबत मला शंका आहे एका सुरक्षा क्षेत्रात काम करणारा माणूस मला भेटला. त्याने एक पुस्तक दिले त्यामध्ये मोसाद या इस्त्रायलच्या एजन्सीची कार्यपध्दती सांगितली आहे. त्यात सांगितले आहे की, कोणत्याही व्यक्तिला मारण्यापूर्वी त्याच्या चालकाला मारावे लागते. जर ती व्यक्ति कारमध्ये असेल तर कारच्या चालकाला जर व्यक्ति विमानात असेल तर पायलटला मारले जाते असे त्यांनी उदाहरण दिले. तसेच घातपात आहे का याची राज्यभरात चर्चा आहे, या घटनेत महाराष्ट्राचा नेता गेला आहे त्यामुळे मला याची शंका येत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
विमानाचा अपघात होताना पायलटने मेडे कॉल का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद केला होता? पायलटला विमानाचा अपघातच घडवायचा होता का? असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी विचारले. दादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थेनंच करावी, पण त्याचसोबत फ्रान्स किंवा अमेरिकेच्या तपास संस्थेनेही करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.
"पूर्व विदर्भाच्या एका नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं. ती फाईल महत्त्वाची आहे आणि आजच सही करावी असा आग्रह होता. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. तसेच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता. पण तो यायला खूपच उशीर झाला. त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे.
गेल्या काही दिवसात दादांनी प्लॅस्टिक बाटली वापरण्याचं बंद केलं होतं. त्यांनी काचेच्या बाटलीतून पाणी प्यायला सुरूवात केली आणि ती बाटली नेहमी त्यांच्या विश्वासू सुरक्षा रक्षकाच्या हाती असायची असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी असं का केलं, त्यांना काही कुणकुण लागली होती का? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला.