“...मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा”:  राज ठाकरेंचा सरसंघचालकांवर घणाघात 

<p>“...मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा”:  राज ठाकरेंचा सरसंघचालकांवर घणाघात </p>

मुंबई - काल मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी आंदोलन करणे हा एक आजार असल्याचे विधान केले होते. यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करून सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 


राज ठाकरे यांनी म्हटले आहे कि, “मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे.
मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित करण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर, ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला?” 
“संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा. हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार?” असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला आहे.