कोल्हापूर जि.प.–पं.स. निवडणूक : उद्या मतमोजणी, उमेदवारांमध्ये उत्सुकता
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या सोमवारी मतमोजणी होणार असून आज दिवसभर सर्व उमेदवारांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि धाकधूक पाहायला मिळत आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी २ वाजेपर्यंत बहुतांश निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील ६८ गटांसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांना मोठा धक्का बसला होता. आरक्षणामुळे अरुण इंगवले, अंबरिश घाटगे, विजय भोजे, युवराज पाटील, सतीश पाटील, प्रवीण यादव, मनोज फराकटे, पद्मराणी पाटील, मनीषा माने यांचे मतदारसंघ आरक्षित झाले. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवता आली नाही.
तर दुसरीकडे माजी अध्यक्ष उमेश आपटे, बजरंग पाटील, माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, माजी सभापती सर्जेराव पेरीडकर, हंबीरराव पाटील, विजय बोरगे, हेमंत कोलेकर, रोहिणी आबिटकर, स्वरूपाराणी जाधव, रेश्मा देसाई यांचे मतदारसंघ खुल्या प्रवर्गात असतानाही त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले नाहीत.
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी ९ गट अनुसूचित जातींसाठी आरक्षित करण्यात आले होते. विशेष म्हणजे भुदरगड आणि चंदगड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला उमेदवारांसाठी गट आरक्षित झाल्याने ‘महिलाराज’ पाहायला मिळाला.
शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यांतील एकूण ६८ गटांसाठी खुला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती तसेच महिला आरक्षण जाहीर करण्यात आले होते. अनेक ठिकाणी महिला आरक्षणामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून याचा थेट परिणाम निकालांवर होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.