दु:खाच्या काळात जबाबदारी पार पाडली; पटेल–तटकरे यांच्यावर टीका अयोग्य – मंत्री हसन मुश्रीफ
कागल - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल व सुनिल तटकरे यांनी अत्यंत दु:खाच्या काळात नियतीने टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली असून, या प्रकरणात त्यांना ‘व्हिलन’ ठरवणे अयोग्य आहे, असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी लिंगणुर दुमाला येथे मतदान केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्री म्हणून निश्चित करण्याच्या प्रक्रियेत पटेल व तटकरे यांनी पुढाकार घेतला. पवार घराणे पुरोगामी विचारांचे असल्याने निधनानंतरचे सर्व विधी तिसऱ्या दिवशीच पूर्ण केले जातात. अशा परिस्थितीत त्यांनी जबाबदारी स्वीकारली, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, अजितदादांच्या निधनाने संपूर्ण राज्य हादरले आहे. अशा दु:खाच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करणे अथवा अनावश्यक लुडबुड करणे योग्य नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, या संदर्भात आम्हाला सविस्तर माहिती नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात झालेल्या चर्चेत अजित पवार एकटेच सहभागी होते. त्यामुळे याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही. आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नव्याने सावरत असून, विलीनीकरण अथवा अन्य निर्णय घेण्यास त्या समर्थ आहेत. पक्ष जो निर्णय घेईल, तोच माझा निर्णय असेल, असेही त्यांनी सांगितले.
तसेच शरद पवार यांना महाविकास आघाडीच्या वतीने पुन्हा राज्यसभेवर पाठविण्याच्या निर्णयाचे मुश्रीफ यांनी स्वागत करत अभिनंदन केले.