साडेअकरा वाजेपर्यंत जिल्हयात सव्वीस टक्के मतदान
कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीस आज, शनिवारी जिल्ह्यात शांततेत सुरुवात झाली. जिल्ह्यातील एकूण २,६९१ मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू असून सर्व ठिकाणी मॉक पोलनंतर मतदान सुरळीतपणे पार पडत आहे.
कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सकाळी उजळाईवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या उपस्थितीमुळे मतदान प्रक्रियेला अधिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आमदार जयंत आसगावकर यांनी देखील मतदान केले.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावेळी पाचगाव परिसरात भर रस्त्यात भानामतीचा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे.
राधानगरी तालुक्यात ‘पिंक मतदान केंद्रा’वर विशेष व्यवस्था करण्यात आली असून तालुक्यातील सर्व २२३ मतदान केंद्रांवर मॉक पोलनंतर मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. तसेच शिरोळ तालुक्यातही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
दुपारपर्यंत तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे नोंदविण्यात आली आहे –
चंदगड २८.५१ टक्के, आजरा २५.५० टक्के, गडहिंग्लज २१.४९ टक्के, शाहुवाडी २८.१९ टक्के, पन्हाळा २८.९१ टक्के, हातकणंगले २२.८९ टक्के, शिरोळ २२.११ टक्के, कागल २९.७३ टक्के, करवीर २९.०३ टक्के, गगनबावडा ३६.९९ टक्के, राधानगरी ३१.३६ टक्के तर भुदरगड तालुक्यात २६.३४ टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यात एकूणच शांततेत मतदान सुरू असून प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.