महायुतीत शिवसेना शिंदे गटाची नामुष्कीसत्तेत असूनही सत्तेबाहेर असल्याचे चित्र

<h3><em>महायुतीत शिवसेना शिंदे गटाची नामुष्की</em><em>; </em><em>सत्तेत असूनही सत्तेबाहेर असल्याचे चित्र</em></h3>

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीत शिवसेना शिंदे गटाची दयनीय अवस्था पुन्हा एकदा उघड झाली आहे. “महापौर शिवसेनेचाच” अशा मोठमोठ्या घोषणा देणाऱ्या शिंदे गटाच्या पदरी या निवडीनंतर केवळ निराशाच पडली. सत्ताधारी महायुतीत सहभागी असूनही सत्तेच्या महत्त्वाच्या पदांपासून शिंदे गटाला दूर ठेवण्यात आल्याने हा गट केवळ नावापुरता सत्तेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापौरपद भाजपकडे, तर उपमहापौरपद थेट विरोधात निवडणूक लढवलेल्या जनसुराज्य पक्षाकडे गेल्याने शिवसेना शिंदे गट पूर्णपणे बाजूला पडल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे, निवडीनंतर झालेल्या जल्लोषात शिंदे गटाचे नगरसेवक सहभागी न झाल्याने त्यांच्या नाराजीवर शिक्कामोर्तब झाले. काही नगरसेवकांनी गुलाल लावण्यास नकार दिला, तर अनेकांनी सभागृह सोडून दूर राहणे पसंत केले.

महायुतीच्या नावाखाली निवडणूक लढवूनही पदवाटपाच्या वेळी शिंदे गटाला डावलण्यात आल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र असंतोष आहे. यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना मिळणारा सन्मान आणि निर्णय प्रक्रियेत असलेला सहभाग आता पूर्णपणे हरवल्याची भावना उघडपणे दिसून येत आहे.

अधिक धक्कादायक बाब म्हणजे, शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री समर्थक नगरसेवकही निवडीनंतरच्या घडामोडींमध्ये निष्क्रिय आणि अलिप्त दिसून आले. यावरून महायुतीतील त्यांचे राजकीय वजन किती घटले आहे, हे स्पष्ट होते.

एकंदरित, कोल्हापूर महापालिकेच्या निवडीतून शिवसेना शिंदे गटाची कोंडी, अंतर्गत अस्वस्थता आणि भाजपकडून होणारी उपेक्षा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून “सत्तेत असूनही सत्तेबाहेर” अशीच अवस्था या गटाची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.