कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी रूपाराणी निकम, तर उपमहापौरपदी अक्षय जरग
कोल्हापूर : प्रशासक राजवटीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया आज पार पडली. यामध्ये महायुतीच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम यांची महापौरपदी, तर जनसुराज्य पक्षाच्या अक्षय जरग यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली.
महापौर निवडीची प्रक्रिया पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभागृहात सर्व ८१ नगरसेवक उपस्थित होते. सुरुवातीला नगरसेवकांची हजेरी घेऊन उपस्थिती अहवाल पीठासन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर कामकाज पत्रिकेतील विषयांवर कार्यवाही करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात आले. महापौर पदासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन शेंडे आणि महायुतीच्या रूपाराणी निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर दोन्ही अर्ज वैध ठरवण्यात आले. उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी दिलेल्या कालावधीत कोणतीही माघार न आल्याने मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. हात उंचावून झालेल्या मतदानात महायुतीच्या रूपाराणी निकम यांना ४६ मते, तर महाविकास आघाडीचे सचिन शेंडे यांना ३५ मते मिळाली. बहुमताच्या आधारे रूपाराणी निकम यांची महापौरपदी निवड झाल्याचे पीठासन तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जाहीर केले.
उपमहापौर पदासाठी महाविकास आघाडीचे दुर्वास कदम आणि जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग यांच्यात निवडणूक झाली. यामध्ये बहुमत मिळाल्याने अक्षय जरग यांची उपमहापौरपदी निवड जाहीर करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवासी उप जिल्हाधिकारी संपत खिलारी , महापालिकेचे नगरसचिव सुनील बिद्रे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.