भाजप सारख्या जातीयवादी पक्षाला मतदान करण्यापेक्षा शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या काँग्रेसला मतदान करा – छत्रपती मालोजीराजे
वसगडे : भाजप सारख्या जातीयवादी पक्षाला मतदान करण्यापेक्षा शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या काँग्रेसला मतदान करा असं आवाहन माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांनी केलंय. गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार सुदर्शन खोत आणि वसगडे पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार अनिता कांबळे यांच्या प्रचारार्थ वसगडे येथे घेण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात अनुकूल वातावरण असल्याचा दावा करत शाहू–फुले–आंबेडकर विचारधारेवर विश्वास ठेवणारी सर्वसामान्य जनता आजही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं छत्रपती मालोजीराजे यांनी सांगितलं. सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि लोककल्याणकारी योजनांचा वारसा काँग्रेसकडे असून, त्यामुळेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळेल, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा सामाजिक न्यायाचा इतिहास मांडत, सत्तेत असो वा नसो काँग्रेसने नेहमीच सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले.
काँग्रेसचे उमेदवार सुदर्शन खोत यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, गटार व्यवस्था तसेच नागरिकांच्या पेन्शन योजना प्रभावीपणे राबविल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर पंचक्रोशीतील नऊ गावांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ सिस्टीम, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन शिबिर व अभ्यासिकांची उभारणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी भानुदास भोसले, प्रकाश कांबळे, संदीप भोसले, संदीप कामत, सुशांत कामत, किशोर फाळके, शितल कांबळे, निशा कांबळे, दया कांबळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.