भारत - अमेरिका व्यापार करारावरुन स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी आक्रमक

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना बोलावून शेतकऱ्यांचे श्राध्द घाला : राजू शेट्टी

<p>भारत - अमेरिका व्यापार करारावरुन स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी आक्रमक</p>

कोल्हापूर - अमेरिका आणि भारतामध्ये व्यापार करार झाल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घोषणा केली. भारतावरील आयात शुल्क २५ टक्क्यांवरुन १८ टक्क्यांवर आणत असल्याचे त्यांनी जाहीर केले. अमेरिकी शेती मालाला भारतीय बाजारपेठ खुली करणारा हा करार असल्याने या करारावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.

या करारावर आमच्या ५६ इंच छातीच्या पंतप्रधानांनी नांगी टाकून या करारावर सही केली. हा करार म्हणजे भारतीय शेतकऱ्याच्या मृत्यूला संमती देणारा करार आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात बोलावून एकदा भारतीय शेतकऱ्याचे श्राद्ध घालावे, असा टोलाही त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

कोल्हापूरसह महाराष्ट्रातील दुग्धोत्पादक आणि ऊस, मका, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या करारामुळे मोठा फटका बसणार आहे. या करारामुळे अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला फायदा होणार आहे असे म्हणत राजू शेट्टी यांनी मोदींसह अंबानींवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने या करारानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे दावे केले असले तरी माजी खासदार राजू शेट्टींनी हा करार रद्द करण्याची मागणी केली आहे.

 माजी खासदार राजू शेट्टी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित तुम्हाला हा शेतकरी विरोधी करार करायचाच असेल तर एकदा देशातल्या शेतकऱ्यांना मोफत किटकनाशक वाटप करा म्हणजे ते शांतपणे ते पिऊन मृत्यूला कवटाळतील, असे म्हटले आहे.