“कोल्हापुरात काँग्रेसच भारी”; महापालिका निवडणुकीत वर्चस्व कायम

<p>“कोल्हापुरात काँग्रेसच भारी”; महापालिका निवडणुकीत वर्चस्व कायम</p>

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाने शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेसचे वर्चस्व ठळकपणे अधोरेखित झाले आहे. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये महायुतीसह इतर पक्षांनी जोरदार लढत दिली असली, तरी काँग्रेसने कोल्हापुरात आपली पकड कायम ठेवत  विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘कोल्हापुरात काँग्रेसच भारी’ हे पुन्हा सिद्ध केले आहे.

स्थानिक पातळीवरील मजबूत संघटन, अनुभवी नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची एकजूट याचा काँग्रेसला मोठा फायदा झाला. प्रभागनिहाय प्रचारात विकासकामांचे मुद्दे, शहरातील स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद आणि पारंपरिक मतदारांशी असलेले दृढ नाते काँग्रेससाठी निर्णायक ठरले. अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढतीत काँग्रेस उमेदवारांनी बाजी मारत प्रतिस्पर्ध्यांना चांगलाच धक्का दिला.

विशेष म्हणजे, राज्यातील राजकीय उलथापालथींचा फारसा परिणाम कोल्हापूरच्या मतदारांवर झाला नसल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, मंत्री आणि तब्बल दहा आमदारांची ताकद लावण्यात आली होती. शिवसेनेच्या दोन्ही गटांसह इतर पक्षांनीही जोरदार प्रयत्न केले; मात्र तरीही काँग्रेसने आपला पारंपरिक जनाधार टिकवत बहुसंख्य जागांवर आघाडी घेतली.

महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक ३४ जागा मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ भाजपाला २६, शिवसेना (शिंदे गट) १५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ४, जनसुराज्य पक्षाला १ आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) १ जागा मिळाली आहे.

निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा विजय काँग्रेससाठी संजीवनी ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. कोल्हापूरच्या राजकारणात काँग्रेस अजूनही केंद्रस्थानी आहे, हे या महापालिका निवडणुकीने स्पष्टपणे दाखवून दिले आहे.