पैशाच्या ‘सागरात’ पराभव, पण सोशल मीडियावर विजयाचा ‘सरदार’
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आणि अनेक अनपेक्षित निकालांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवार विजय बाबुराव साळोखे-सरदार यांची. अत्यंत निर्विकारपणे, थेट आणि मनमोकळ्या शैलीत बोलत त्यांनी प्रचारादरम्यान मतदारांच्या मनावर ठसा उमटवला. आपल्या आक्रमक भाषाशैलीने आणि मुद्देसूद मांडणीने त्यांनी विरोधी उमेदवारांना अक्षरशः “सळो की पळो” करून सोडले. सुरुवातीला सोपी वाटणारी ही लढत शेवटच्या टप्प्यात मात्र चांगलीच रंगली.
या प्रभागात मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी चा वापर झाल्याची चर्चा जोरात होती. “लक्ष्मी घरोघरी पोहोचली” अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. एकंदरितच पैशाच्या ‘सागरात’ ही निवडणूक पार पडल्याचे चित्र होते.
जरी विजय बाबुराव साळोखे-सरदार यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला असला, तरी सोशल मीडियावर मात्र ते सर्वांच्या गळ्यातील ‘सरदार’ ठरले. त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ, वक्तव्ये आणि प्रचारशैली मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून, जनमानसात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. निवडणूक हरली असली तरी लोकप्रियतेची लढाई त्यांनी निश्चितच जिंकली, हे मान्य करावे लागेल.