पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे...: ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांचा राजीनामा
कोल्हापूर - महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे संपूर्ण राजकीय व नैतिक जबाबदारी स्वीकारून, मी कोल्हापूर शहर प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
या निवडणूक प्रक्रियेमध्ये स्थानिक पातळीवरील अंतर्गत गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि संघटनात्मक दुर्लक्ष याचा थेट फटका पक्षाला बसला आहे. वारंवार वरिष्ठांना याची कल्पना देऊनही संघटनात्मक ताकद एकत्र उभी राहू शकली नाही. तरीही पक्षाची प्रतिमा, युतीची जबाबदारी आणि शिवसेनेची परंपरा जपण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केला आहे.
विशेषतः काँग्रेसचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी युतीधर्म पाळत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केले, ते उल्लेखनीय असून त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. पदावर राहून स्पष्टीकरण देण्यापेक्षा, राजकीय जबाबदारी स्वीकारून निर्णय घेणे हे शिवसेनेच्या संस्कृतीला साजेसे आहे, या भावनेतूनच हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मात्र याचा अर्थ पक्षाशी निष्ठा कमी होणे असा नसून, यापुढेही मी मातोश्रीशी एकनिष्ठ राहून, कोणतेही पद न स्वीकारता, एक सामान्य शिवसैनिक म्हणून पक्षासाठी काम करत राहीन, असेही त्यांनी म्हटले आहे.