मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात; कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

<p>मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात; कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद</p>

कोल्हापूर - मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून अनेक ठिकाणी मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. विशेषतः कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे.

कोल्हापुरात मतदान केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. लोकशाहीचा उत्सव म्हणून नागरिकांनी शांततेत आणि शिस्तीत मतदान करत सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांसह होमगार्ड्स आणि इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क असून सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.