चांदेकरवाडी वादग्रस्त पाणंद रस्ता आणि भानामती...

<p>चांदेकरवाडी वादग्रस्त पाणंद रस्ता आणि भानामती...</p>

कोल्हापूर - पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडे अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटनांमधील वाढ चिंताजनक आहे. चांदेकरवाडी मध्ये असाच अंधश्रध्देचा प्रकार उघडकीला आला आहे.

 गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून चांदेकरवाडी गावातील काही शेतकरी आणि ग्रामपंचायत प्रशासनात हद्दीवरून पाणंद रस्त्याचा वाद सुरू होता. ग्रामपंचायत स्तरावर तोडगा निघाला नसल्याने हा वाद राधानगरी तहसीलदारांपर्यंत गेला. तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागिलती होती. यावर प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांनी भेट देऊन पाहणी केली. ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे पाणंद रस्त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी प्रत्येकी पन्नास टक्के जमीन देण्याचा ठराव, ग्रामपंचायत आणि शेतकऱ्यांशी झालेली चर्चा तसेच तहसीलदारांनी दिलेला पूर्वीचा आदेश या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रांताधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचे अपील नामंजूर करत पाणंद रस्ता तातडीने खुला करण्याचे आदेश दिला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २९ डिसेंबर रोजी रस्त्याचे काम सुरू होणार होते. मात्र, काम सुरू होण्यापूर्वीच रस्त्याच्या बाजूला एका शेतकऱ्याच्या बांधावर भानामती करण्यात आल्याचे   उघडकीस आले. बांधावर लिंबू आणि काळी बाहुली बांधण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकारामुळे प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात अंधश्रद्धेच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा गावात सुरू झालीय. भानामती करुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम  करणाऱ्या त्या अज्ञातांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.